Thursday, March 27, 2014

या वळणावर ….!!!

                           " श्री"                        

  या वळणावर ….!!!



प्रिय तरुणाईस ,
अनेक शुभेच्छा . 

           यापूर्वी मी वर्ष २००८'-२००९ मधे काही निवडक विषयावर पत्रे लिहिली आहेत . देवान माणसाला सुंदर आयुष्य दिलेलं आहे. या आयुष्यावर  लिहायला मला नेहमीच आवडत आल आहे. आज चैत्र शुध्द १, नूतन वर्ष . गुढी पाडवा नवीन मराठी वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा! लवकरच साखरपुडा, लग्न-विवाह सोहळे सुरु होतील. वसंतात सुरु होणाऱ्या आयुष्याच्या या वळणावर तुमच्या आयुष्यात नवीन रंग भरला जाईल . स्वप्नातला राजकुमार घोडयावर बसून येईल आणि राजकुमारीला दूरदेशी घेऊन जाईल . असे सारे मांगल्याचे, उल्ल्हासाचे आणि आनंदाचे दिवस. मात्र फक्त विवाह होणे महत्वाचे नाही. लग्न -विवाह बंधन चांगल्या प्रकारे टिकविणे ही आता काळाची गरज झालेली आहे. आम्ही आजच्या तरुण पिढीला जास्तच स्वातंत्र्य दिलेलं आहे. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही स्वैराचाराची अपेक्षा नाही. तेव्हा त्यांनी स्वैर न रहाता त्यांच्या चंचल मनाला स्वःताचा लगाम असावा म्हणून हा लेख प्रपंच करीत आहे . सोबत एकूणच आदर्शवाद आणि विवाह विषयक  विचारांची थोडीफार स्वैर भटकंती करूया !!

          आपले आई वडील ,भाऊ- बहिण ,मित्र ,नातेवाईक यांच्या बरोबर बऱ्याच गोष्टी आपण समक्ष बोलू शकत नाही . शब्दाने ,इशाऱ्याने ,देहबोलीने सांगायचं असत ते व्यक्त करू शकत नाही . इच्छा असूनही योग्य वेळेची वाट पाहत सांगायच राहूनच जात . अशा सर्व गोष्टीसाठी पत्र लेखन करण कधीही उत्तम . जे काही बोलायचय, सांगायचय,मनापासून व्यक्त करायच असत ते सहज योग्य शब्दात लिहिता येत . वर्ष १९७५ साली मी भारतीय हवाई दलात चेन्नई येथे ट्रेनीगला असताना त्यावेळी टेलिफोन ,मोबाईल ,ईमेल अशी काहीच सुविधा नव्हती . त्यावेळी एकमेव संपर्काच माध्यम म्हणजे हस्तलिखीत पत्र . पत्रान काय तो सर्वाशी संपर्क साधायचा . रोज रात्री जेवणानंतर चार-पाच पत्र लिहायची . सुट्टीचे दिवस सोडता महिनाभरात सरासरी १०० पत्रे लिहायचो आणि तेवढीच पत्रे यायची . आता मात्र हे वाचायला तुम्हाला ,अतिशयोक्ती वाटेल . असो . मला पहिल्यापासूनच वाचन -लेखन साहित्याची आवड होती . त्यामधे कथासंग्रह ,कविता ,नाटके ,कादंबऱ्या, आत्मचरीत्र यांची विशेष आवड असल्याने मी रसभरीत लिहिलेली पत्रे माझे बंधू ,मित्र-मैत्रिणी ,काका ,माझे शाळा आणि कॉलेजचे शिक्षक यांना भरपूर आवडायची . त्यामध्ये प्रामुख्याने प्रवास वर्णन ,स्थलदर्शन ,प्रशिक्षण ,मनाची भटकंती -विचार आणि लहान-सहान कविता असायच्या . त्यावेळी पत्र माझ्यासाठी भरपूर मजेशीर -आनंददायी गोष्ट होती . मात्र आता तीस पस्तीस वर्षानंतर खऱ्या अर्थान प्रगत संगणक युग आल आहे . चोवीस तास मोबाईल फोन ,इ-मेल ,मेसेज वगेरे गोष्टी अगदी कमी वेळेत झटपट होत असल्यान पत्र लिखाण अगदीच इतिहास जमा होत चालल आहे. अस असल आणि पत्र लिहीनेची गरज अगदीच नसली तरीही जमेल तेव्हा अधून मधून मित्र नातेवाईकांना पत्र लिहित राहणे चांगली गोष्ट आहे अस मला वाटत . तुम्ही तरुणाईने आठ दहा दिवसांनी एखाद पत्र लिहायला हरकत नाही . नियमित लिहित गेलात तर पत्र लिखाणाची मजा आणि आलेलं हस्तलिखीत पत्र वाचण्याची मजा -आनंद तुम्हाला समजेल .प्रयत्न करून पहा आनंदच मिळेल !

            मी खंडाळा येथे प्रशिक्षण संस्थेमधे प्रशिक्षक म्हणजे खऱ्या अर्थाने शाळा मास्तरच आहे . मी शिकवत असलेल्या विषयाबरोबर प्रशिक्षणार्थीचे चांगले ,आदर्श व्यक्तिमत्व होणेसाठी ,सकारात्मक मानसिकता होणेसाठी आनंदी सुंदर आयुष्य जगणे साठी इतर वेगवेगळ्या विषयावर जमेल तेव्हा आणि जमेल तितक प्रबोधन करीत असतो . यश ,घर-नातेसंबध  ,प्रेम,सुंदर जीवनासाठी अलिखीत  आचारसहिंता ,विवाह-जन्मगाठ ,आयुष्याचे व्यवस्थापन ,भ्रष्टाचारमुक्त भारत वगेरे विषयावर बोलत असतो . आमच्या संस्थेतून बाहेर पडणारा प्रशिक्षणार्थी सक्षम तर हवाच त्याचबरोबर सहृदय माणूस असावा असाच माझा प्रयत्न आणि हट्ट असतो .

             अंदाजे मागील शंभर वर्षापासून आपल्याकडे समृद्ध -आदर्श कुटुंबपद्धती चालत आलेली आहे . जेथे आई-वडील ,आजी - आजोबा ,काका -काकू आणि भरपूर चिल्लर पार्टी असायची . लहान मुले मोठी होताना मोठ्या एकत्र कुटुंबातून -भरपूर लोकांच्या सहवासातून ,आजी - आजोबा आणि जेष्टांच्या सत्संगातून संस्कारीत व्हायची .  एकत्र कुटुंबातील संस्कारांचा असा भक्कम पाया व्हायचा की पुढे आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आपल्या जीवनाचा संघर्ष समर्थपणे करणेची ताकद निर्माण व्हायची . असे नितीमुल्ये आधारीत संस्कार ज्याची आयुष्यात पदोपदी गरज असते . मात्र पुरोगामी आणि प्रगती -प्रगती म्हणताना आम्ही आमची कुटुंब व्यवस्थाच बदलली . एकत्र कुटुंबाचे सर्व फायदे विसरून आणि संकुचित वृतीने विभक्त - लहान कुटुंबात आनंद माणू लागलो . आता पती -पत्नी आणि दोन मुले आणि प्रगतीची घोडदौड . आमची जीवनशैलीच बदलली. चांगले संस्कार ,नितीमुल्ये ,स्वयंशिस्त ,आदर्शवाद वगेरेबाबत आम्ही काहीसे संकुचित झालो . आई -बाबांना नोकरी व्यवसायातून आणि घर ग्रहस्तीतून मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही ,बाहेर शाळा -कॉलेज आणि समाजाला फारस काही पडलेलं नाही , त्यामुळे चांगली कुटुंब व्यवस्था ,चांगले संस्कार ,आदर्श सुंदर जीवनपद्धती या साऱ्यांचा घोळच जास्त झाला . त्यातूनही जे जागरूक पालक आहेत ते निश्चित आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करतात . मात्र घराबाहेर समाजव्यवस्थेत ,जीवनशैलीत आणि नितीमुल्यात एवढी घसरण झाली आहे की , या नवीन समाजात वावरताना चांगल्या माणसाचीही संभ्रमावस्था होते . बरोबर या मानसिकतेचा मागील दहा -वीस वर्षात आपल्याकडे गुरु -धर्मगुरू ,सत्संग बैठका ,आध्यात्मिक गुरु(भोंदू ) आणि त्यांचे आश्रम यांची संख्या भारतभर हजारोंच्या संखेने आहे . दूरदर्शनवर रात्रभर सर्व धर्मांच्या या देवदूतांचे (भोन्दुंचे)जोरदार प्रवचने चालू असतात .एक चानेलवर आम्ही हॉलीवूड - बॉलीवूडचे मारधाड सिनेमे पहायचे ,दुसऱ्या चानेलवर फ्याशन टी . व्ही . च्या नावाखाली वस्त्रहरण पहायचे आणि पुढच्या चानेलवर बाबांचं आध्यात्मिक प्रवचन . या साऱ्या खिचडी संस्कार आणि संस्कृतीमुळे तरुण वर्ग संभ्रमात नाही पडला तरच नवल. असो !

            आता तुम्हा तरुणाईसाठी महत्वाचा विषय ! शिक्षण ,नोकरी ,करिअर आणि वैवाहिक जीवन !  यातील प्रत्येक गोष्ट आप -आपल्या ठिकाणी महत्वाची आहे . आनंदी , समृध्द जीवन जगनेसाठी या सर्वांचा समतोल कसा राखायचा हीच खरी जीवन जगणेची कला आहे . या विषयावर थोडीफार चर्चा करू या .

           आपण क्रमवार आयुष्याचा लेखा -जोखा पहिला आणि त्याचे बारकाईने अवलोकन केले तर सर्व सामान्य माणसाचे आयुष्य जगणे ,सुख  समृध्दीचे आयुष्य जगणे आणि चिरंतन आनंद (eternal happiness ) देणारे आयुष्य जगणे या बाबत थोडयाफार गोष्टींचे आकलन आपल्याला होईल . आश्याप्रकारे आयुष्याकडे मोजपट्टीने पाहताना प्रत्येकाच्या आयुष्याविषयी कल्पनेत आणि वास्तवतेत व्यक्तीसापेक्ष आणि काळसापेक्ष
कमी जास्त फरक असेल . तरीही  एक आदर्श जीवन पद्धती ,पती -पत्नी आणि कुटुंबाला चिरंतन आनंद देणारी जीवनशैली काय असावी याबाबत विचार होणे जरुरी आहे .तुम्ही तरुणाईने आयुष्याच्या या वळणावर वैवाहिक जीवनाकडे पाहणेचा सकारात्मक विचार करायला हवा . त्यासाठी विविध विषयावर समृध्द वाचन ,मनन ,.चिन्तन, चर्चा ,सत्संग आणि अंतरमुख होऊन योग्य जीवनपद्धती -जीवनशैली निवडा .(Lifestyle-art of living ). असे जर तुम्ही मनापासून करू शकलात तर तुमच सार आयुष्य सहज सुंदर आनंददायी होईल हे निशित !

              लहान मुल चालायला बोलायला लागल्यापासून शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईतो त्याच्यावर झालेले संस्कार आणि त्याच्या सभोवतालची भौगोलिक -सामाजिक परिस्थिती या नुसार त्याच्या अंतरमन आणि बाह्य मनाची जडण -घडण होत असते . त्यांच्या मूळ प्रकृती स्वभाव आणि त्याच्यावर झालेले एकूण संस्कार यातून त्याचे आगळे वेगळे (unique )व्यक्तिमत्व तयार होऊ लागत . या कालावधीमध्ये जे नितीमुल्याचे,चांगल्या शिस्तीचे आणि उत्तम असे  संस्कार होतात , त्याचा दीर्घकालीन प्रभाव आयुष्यावर राहतो . पुढे अनुभवान ,उच्च शिक्षणानंतर ,नोकरी व्यवसायात आणि वैवाहिक जीवनात प्रवेश करताना आयुष्याकडे बघणेचा दृष्टीकोन हळूहळू बदलत जातो . स्वभावात व्यवहारीकता व व्यावसाईकता डोकावते . तसे ते योग्यही असत. बरोबर याच ठिकाणी कधी कधी आयुष्यात अमुलाग्र बदल (drastic change ) होऊ लागतात . काही व्यक्ती स्वताला शिक्षण,नोकरी आणि करिअरमधे झोकून देतात. त्यांच्या जिवनाच सार ध्येय (target ) या आणि अशा ध्येयवादी गोष्टीमध्ये अडकून पडलेल  असत .शिक्षण ,नोकरी ,करिअर हेच महत्वाच होऊन जात . हे सार उत्तम रित्या करणे म्हणजे यशस्वी आयुष्य असा यांचा समज  असतो . या मानसिकतेतून माणूस बाहेर आला नाही तर आयुष्य काहीस यंत्रवत होत . ध्येयाचा ,करिअरचा अतिरेक करणारे आणि देशाला वाहून घेणारे सारे यातलेच . हे सामान्य माणसाचे आयुष्य जगत नाहीत . जेवढे काही संत महात्मे झाले त्यामध्ये महात्मा गांधी ,विनोबा भावे ,मदर तेरेसा ,ए. पी ज़े कलाम यांना याच उच्च ध्येयवादी चाकोरीतले म्हणावे लागेल . यांचे व्यक्तिमत्व असामान्य असून ते सामान्य माणसाच्या संसार सुखात रमत नाहीत. असे शेकडो व्यक्तिमत्व भारतात होऊन गेले आणि आजही आहेत . यांनी घर संसाराचा फारसा विचार केलेला दिसून येत नाही . मात्र आपण सामान्यात राहूनही चांगल्या जीवनशैलीन ,जीवन जगणेच्या कलेन असामान्य चिरंतन आनंद देणारे आयुष्य जगू शकतो . गरज आहे फक्त अश्या प्रकारे जगणेच्या जाणिवेची आणि त्यासाठी आयुष्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापनेची . शिक्षण ,नोकरी ,करिअर आणि भौतिक सुखे हे सार आप .  -आपल्या ठिकाणी योग्य आहेतच . मात्र त्यांचा योग्य समतोल राखणे जरुरी आहे . माणूस शिक्षणान ,नोकरी -व्यवसायान ,समाजातील पद आणि पैशान किती मोठा झाला हे महत्वाच नाही . त्याहून किती मोठा सहृदय माणूस झाला हे महत्वाच आहे ! आध्यात्मिक प्रवचन देणारे जैन साधू तरुण सागर आणि प्रमिलाताई ठकार म्हणतात कि ,माणसाच या विश्वातून प्रयाण होताना तो स्वतःबरोबर काहीच नेत नाही . आत्म्याच्या सदऱ्याला एकही खिसा नसतो . म्हणजेच आयुष्यभरात आपण कितीही नाव , पैसा ,ऐश्वर्य कमावलं तरी सोबत काहीएक नेता येत नाही ,म्हणून प्रत्येक प्रज्ञावंत माणसाने आपल्या आदर्श आयुष्याची संकल्पना मांडायला हवी . ती वेळोवेळी तपासून पाहायला हवी . जेणेकरून आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आपण चुकलोच या सुखाला , मुकलोच या आनंदाला असे म्हणणेची वेळ येणार नाही .

             माझ आयुष्यावर विचारांची गर्दी झालेलं पत्र काही संपता संपणार नाही . तेंव्हा आवरत घेऊन लग्न -संसार आणि वैवाहिक जीवनाविषयी बोलूया .

              लग्न संस्कार ! प्रत्येकाच्या आयुष्यात येणार एक महत्वाच वळण . अपवाद सोडता प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी हि सारखीच महत्वाची घटना . या महत्वाच्या वळणावर आयुष्यात अमुलाग्र बदल (drastic change)  होत असतात  . तरुणाईच्या बेधुंद आयुष्यानंतर खऱ्या अर्थाने गाडी रुळावर येऊ लागते. हा बदल सहजपणे स्वीकारनेसाठी नूतन पती - पत्नीने आपल्या आयुष्याकडे बघनेचा दृष्टीकोन -मानसिकता काहीशी बदलावी लागते . हा बदल जेवढा सहजपणे ,आनंदाने स्वीकारता येईल तेवढा जगणेचा आनंद मोठा असेल . लग्न तरुणाईतील स्वप्नील उनाड मनाला ,पोरकटपणाला आणि बऱ्याच वेळा दिशाहीन आयुष्याला योग्य मार्गावर आणू शकत ,बेधुंद आयुष्याला लगाम घालू शकत . आयुष्याच्या या वळणावर दोघांच्या आयुष्यात मोठया चांगल्या बदलाच्या गोष्टी होऊ शकतात .लग्न म्हणजे आयुष्यातील असे सुंदर वळण जेथे पायवाट मुख्य मार्गाला आणि मुख्य मार्ग महामार्गाला भेटतो . ज्याप्रमाणे ज्ञानी विध्यार्थी आणखी प्रज्ञावंत होणेसाठी विश्वविद्यालयात प्रवेश घेतो तशीच काहीशी परिस्थिती - मनस्थिती या वळणावर असू शकते . येथून पुढे आयुष्याचा मार्ग प्रशस्त होणे अपेक्षीत आहे . त्यासाठी गरज आहे  या राज्य मार्गावर  प्रवेश करताना -वैवाहीक जीवनाच्या विश्वविद्यालयात प्रवेश करताना योग्य ती समज -उमज घेणेची . असे झाले तरच पुढचा प्रवास सहज सुंदर आणि आनंददायी होईल . लग्नाच्या या वळणावर आणि सप्तपदीच्या प्रत्येक पावलाबरोबर जन्मभराच्या गोष्टी समजणेच्या आहेत,जेणेकरून लग्न या संस्कारातून दोघांच्या आयुष्यात एक नवीन प्रवाह, नवीन विचारधारा ,प्रशस्त जगणेचा मार्ग तयार होऊन नाविन्यपूर्ण आणि आनंददायी जीवन जगता येईल . स्वतःचं आणि सहजीवनसाथीच आयुष्य खऱ्या अर्थाने परिपूर्ण करता येईल . जेव्हां या वळणावर आपण येवढ्या गांभीर्याने आयुष्याकडे पाहतोय तेव्हा यापुढे त्यातील काही निवडक आणि महत्वाच्या गोष्टी विचारात घेणे जरुरी आहे .

             दोन वेगवेगळ्या कुटुंबातून ,वेगवेगळ्या संस्कारात वाढलेल्या दोन व्यक्ती लग्नानंतर वैवाहीक जीवन सुरु करतात तेव्हा त्यांच्या आचार -विचारांचे ,संस्कार आणि नितीमुल्यांचे मिश्रण न होता एकजीव होणे जरुरी  आहे .असे होण्यासाठी दोघांनीही आपले व्यक्तिमत्व तपासून पाहणे जरुरी आहे . आपले लहानपण ,आई -वडील  आणि आजी -आजोबांचे संस्कार, शाळा -महाविद्यालयातील शिकवण ,समाजातील चालीरीती -रूढी परंपरा अश्या सगळ्याच गोष्टींचा विचार होणे जरुरी आहे . कोणताही माणूस परिपूर्ण नसतो . प्रत्येक   माणसात गुणदोष  असतातच  . एकदम परिपूर्ण माणूस ,सर्वगुणसंपन्न ,आदर्श व्यक्तिमत्व शोधून सापडणे कठीणच . म्हणून ज्याप्रमाणे आपण जिवलग मित्राला त्याच्या गुण-दोषासाहित मनापासून स्वीकारतो त्याचप्रमाणे पती -पत्नीने एकमेकांचा मनापासून स्वीकार करणे जरुरी आहे .प्रत्येक व्यक्ती आपआपल्या ठिकाणी योग्यच असते . त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीने आपल्यासाठी पूर्णपणे बदलावे अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे होईल . म्हणून सकारात्मक दृष्टीकोन असणारी व्यक्ती स्वतामध्ये बदल करील . हीच गोष्ट पती पत्नीला जमली तर जगणेची मजा काही औरच असेल . चांगल्या गुण -दोषांच्या व्यक्तीला आपण एकदा मित्र म्हणून स्वीकारल्यावर त्याच्यातील चांगल्या गोष्टीच आपण पाहतो तसेच लग्नानंतर पती पत्नीने एकमेकांच्या त्रुटी उणीवा काढनेपेक्षा त्यांच्यातील फक्त चांगल्या -सुंदर गोष्टींचा शोध घेणे जरुरी आहे .  लग्नानंतर पत्नीने पतीमधील चांगला मित्र आणि पतीने पत्नीमधील चांगली मैत्रीण जपली पाहीजे . म्हणजे काय , तर दोघांमधे सकारात्मक विचारांची देवाण -घेवाण असावी ,वागण्यामध्ये स्पष्टता असावी ,एकमेकाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ असणे जरुरी आहे . सहजीवनात एकदुसरेच्या मताला ,आचार -विचार आणि स्वभावाला पुरेसा  स्पेस देणे जरुरी आहे . प्रत्येक व्यक्तीला वेगळ मन आणि वैयक्तिक मते असू शकतात आणि त्याचा दोघांनीही आदर करणे जरुरीचे आहे . पती पत्नीच्या नात्यामधे अहंकाराचा लवलेशही नसावा . दोघांनीही एकमेकांचा आत्मसन्मान जपावा . दोघ सुखी संसाराच्या गाडीची एकमेकांना पूरक आणि समतोल राखणारी प्रमाणबध्द लयबध्द चाकं होण  जरुरी आहे . जेव्हा एक चांगली पत्नी होते ,चांगला पती होतो तेव्हाच दुसऱ्याकडून प्रामाणिक चांगली अपेक्षा ठेऊ शकतो. दोघांनीही एक दुसरयाला पूरक होणे जरुरी आहे . त्यासाठी पती -पत्निमधे नितांत चांगला संवाद होणे जरुरी आहे . वादापेक्षा सुसंवाद होणे गरजेचे आहे . पती पत्नीमधील खऱ्या  प्रेमामधे अपेक्षेपेक्षा त्यागाची भावना जास्त असायला हवी . आयुष्याच्या या आणि पुढील कोणत्याही वळणावर एकमेकाना दोष देण्यापेक्षा सकारात्मक विचारातून आयुष्यातील कोणताही गुंता सहज सोडविता येईल . कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करणेसाठी  ताकद राहील .

            पती पत्निमधे सुंदर नात्यांचा स्वीकार ,प्रेम ,आदर ,सहानुभूती ,समंजसपणा, एक दुसऱ्यासाठी त्यागाची भावना वगेरे सुखी समृध्द जीवनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी भरपूर असाव्यात . लग्नानंतर दोघांनीही आपल्या जादुई चांगलेपणाने आणि प्रेमाच्या परिस स्पर्शाने दुसऱ्याच्या आयुष्याचे सोने करावे अशी भावना ठेवल्यास एक आदर्श पती पत्नी व्हायला वेळ लागणार नाही . येथे पती पत्नी आणि प्रेमाबाबत काही ठळक गोष्टी लिहिण्याचा मोह मी आवरू शकत नाही .
  • फक्त प्रेम आणि प्रेमामधेच मन आणि जग जिंकता येत . 
  • प्रेमामधे १००%एकमेकांचा मनापासून स्वीकार करणे जरुरी आहे .
  • खऱ्या निःस्वार्थ प्रेमामधे त्यागाची भावना मोठी असते . 
  • सुखी संसारात एकदुसऱ्याचे संस्कार ,नीतिमूल्ये ,आचार- विचार यांचा आदर करणे जरुरी आहे . 
  • प्रेमामधे अटी-नियम ,अविश्वास ,राग -द्वेष यांना जागा नाही . 
  • विश्वास हा प्रेमाचा आणि नितांत सुंदर जीवनाचा भक्कम पाया आहे .
  • प्रेमामध्ये हटवादीपणा ,दांभिकपणा ,गर्व ,अहंकार याला थारा नाही . 
  • प्रेमानंतर लग्न किवा लग्नानंतर प्रेम या दोन्ही ठिकाणी सकारात्मक तडजोड महत्वाची असते. 
  • माझ्यापेक्षा दुसऱ्याची गरज मोठी आहे अशी जाणीव ठेऊनच प्रेम वाढीस लागत . 
  • खऱ्या प्रेमात कधीही हार जीत नसते . असते ती फक्त दुसऱ्याचे मन जिंकण्याची प्रामाणिक भावना . 
  • निःस्वार्थ प्रेम दिसत नसत ,दाखवावं लागत नाही मात्र हृदयाला आपोआप कळत !
    चला तर !या लांब निबंध -प्रबंधानंतर विश्रांती घेतो . माझ्या मनाची अशी भटकंती चालूच रहाणार आहे . यातून तुम्हाला जमेल रुचेल तेवढेच घ्या . कारण हे माझे विचार आहेत . प्रत्येकाला पटायला हवेच असा माझा हट्ट नाही . मात्र यातील चांगल्या गोष्टींचा तुम्ही स्वीकार करावा आणि त्या चांगल्या गोष्टी आचरणात आणाव्यात असे मनापासून वाटते .

तुम्हा सर्व तरुणाईस सुंदर समृध्द आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा !!!

                                                                                         शाळामास्तर
अनिल शां पाटील
                                                                               

No comments:

Post a Comment